शिंदे गटाच्या दाव्यामुळे नव्हे तर या कारणामुळे शिवसेनेला गमवावे लागणार शिवसेना भवन

निवडणूक आयाेगात पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवावे लागल्यावर आता उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातून शिवसेना भवनही जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने केलेल्या दाव्यामुळे नव्हे तर पब्लीक ट्रस्ट म्हणजे सार्वजनिक न्यायासाची जागा एखाद्या राजकीय पक्षाला वापरता येत नाही. तरीही शिवाई ट्र्स्टने गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा शिवसेनेला दिल्याची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचा निर्वाळा निवडणूक आयाेगाने दिला आहे. त्यामुळे विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाचाही शिंदे गटाने ताबा घेतला आहे. त्यामुळे पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाबाबतही चर्चा सुरू हाेती. शिंदे गटाच्या नेत्यांनी आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही असेही स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत उध्दव ठाकरे यांच्यापुढे नवीनच समस्या निर्माण झाली आहे.  शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे योगेश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.  शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आतापर्यंत या सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली होती. सर्वसामान्यांचा असा समज होता, की ही शिवसेनेची जागा आहे.  मी अधिक माहिती घेतली असता ही जागा शिवाई ट्रस्टची असल्याचं समोर आले. मग कोणत्याही ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही. एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? परवानगी नसताना राजकीय पक्षाने  इतके दिवस कार्यालय का वापर? याबाबत कारवाई करा किंवा  नुकसान भरपाई भरा, असे देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  ट्रस्टच्या उद्दिष्टांचे उल्लंघन करत असेल, तर विश्वस्तांना  का निलंबित/काढले जाऊ नये आणि प्रशासक का नियुक्त करू नये? आतापर्यंत झालेले नुकसान विश्वस्तांकडून का वसूल केले जाऊ नये? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे.