राज्याच्या राजकारणात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये नेतृत्वावरून संघर्ष सुरू झाला आहे. अद्याप दृष्टीक्षेपातही नसलेल्या मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष कार्यकर्त्यांपर्यंत पाेहाेचला आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री जयंत पाटीलअसे बॅनर लागले हाेते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली हाेती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यात अस्वस्थता पसरली हाेती. याला प्रत्युत्तर देताना दादासमर्थकांनी थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयाबाहेरच ‘भावी मुख्यमंत्री अजित पवार’ असे बॅनर लावले आहेत.
काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंकेंनी अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं होते. जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील. असे निलेश लंकेनी म्हटले हाेते. मुळात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेचा धाकटा भाऊ आहे. राज्यात सत्ता स्थापन झाली तेव्हा उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले हाेते. आता अशा प्रकारचे बॅनर लावून पक्षांतर्गत विराेधक जयंत पाटील यांना उत्तर देण्याबराेबरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाही खिजविण्यात येत आहे अशी चर्चा सुरू आहे.
