स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पुन्हा बरळले. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे, असा आरोप त्यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता का गप्प असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला आहे.रायपूर येथील काँग्रेस अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, एक मंत्री म्हणत आहेत चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. मग आम्ही त्यांच्याशी कसं लढू शकतो? इंग्रजांशी लढताना भारताची अर्थव्यवस्था मोठी होती का? ह्याला भ्याडपणा म्हणतात. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे. म्हणजे कमकुवत असणाऱ्यांशीच तुम्ही लढणार का? याला भ्याडपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद. आम्हाला सत्याग्रही म्हणता, पण तुम्ही सत्ताग्राही आहात.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या विधानाचा निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, तुम्ही काँग्रेससोबत सत्तेत होते. तेव्हा तुमची मजबुरी होती. मात्र आताही तुम्ही शांत का? मला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एक गोष्ट विचारायची आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. मागच्या काळात उद्धव ठाकरे यांची मजबुरी होती. त्यांना सरकार चालवायचे होते. त्यामुळे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करायचे तरी उद्धव ठाकरे मूग गिळून बसायचे. मात्र आता तुमची काय मजबुरी आहे?
