औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव नामांतराचा निर्णय झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान गुरुवारी (9 मार्च) इम्तियाज जलील यांनी शहरात कँडल मार्च काढला होता. मात्र याच कँडल मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही जलील यांनी कँडल मार्च काढल्याने त्यांच्यावर शहरातील सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पोलिस प्रशासनाने शहरातून कँडल मार्च काढण्यास परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांना सोबत घेत कँडल मार्च काढला होता. आता या विरोधात पोलिसांनी खा. जलील आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी संध्याकाळी खा. इम्तियाज जलील यांनी हजारो समर्थकांना सोबत घेत शहराच्या नामांतराविरोधात कँडल मार्च काढला. नामांतरविरोधी कृती समितीतील सदस्य तसेच हजारो महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गुरुवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला. शहराचं नाव औरंगाबाद हेच कायम राहवं, अशी मागणी करत हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला. राज्य तसेच केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केलं आहे. याविरोधात औरंगाबाद नामांतर कृती समितीच्या वतीने मागील सात दिवसांपासून बेमुदत आंदोलन केलंय जातंय. याच आंदोलनाचा भाग म्हणून काल शहरात भव्य कँडल मार्च काढण्यात आला.
