गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड,केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ चा उद्घाटन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय मंत्री (पेट्रोलियम व नैसर्गिक वायु) हरदीप सिंह पुरी यांनी लाईट ॲड साउंड शो शुभारंभ प्रंसगी व्हिडीओ संदेश द्वारे शुभेच्छा दिल्या. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले,आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.आज ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून गेली.गेट वे ऑफ इंडिया चा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे हे लक्षात घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकोनातून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशभरात अनेक कार्यक्रम साजरे केले जात आहेत .त्याचाच एक भाग म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथे ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ सुरु करण्यात येत आहे. ब्रिटीश सैन्याच्या भारतातून शेवटच्या प्रस्थानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आजपासून मीडिया अँड साऊंड शो’ आयोजित केला आहे याचा मुंबईतील नागरिक लाभ घेतील.

फडणवीस म्हणाले, गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.इंडियन ऑईल कंपनीने हा शो आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल.पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि पर्यटन विभागाचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी कमी वेळात हे काम पूर्ण केले आहे.मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा लेझर शो उत्कंठावर्धक वाटला पाहिजे यासाठी विभागाने प्रयत्न करावा. मल्टीमीडिया लाईट अँड साऊंड शो मध्ये नाविन्यपूर्णता राहील याची पर्यटन विभागाने खबरदारी घ्यावी.

हरदीप सिंह पुरी म्हणाले,दिनांक २८ फेब्रुवारी, १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत भूमी सोडून गेली. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आज दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.मुंबई शहराची जगात एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. संपुर्ण जगभरातील पर्यटक शहराला वर्षभर भेटी देत असतात.गेट वे ऑफ इंडियाच्या वैभवात भर टाकण्यासाठी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड,केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय केंद्र शासन यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ इंडियन ऑईलमार्फत पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले,गेटवे ऑफ इंडियातून इंग्रज भारतात आले होते असा इतिहास आपण ऐकलेला आहे पण आजच्या मल्टीमीडिया अँड साऊंड शो कार्यक्रमामुळे भारतातून शेवटचे इंग्रज बटालियन परत गेले हे सर्व भारतीयांना कळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मूळ संकल्पना आहे.हा शो मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत असून हेडसेट घातल्यानंतर जापनीज, जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषेतून देखील ऐकता येणार आहे.