रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई

माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ईडीने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सदानंद कदम यांना मुंबईला आणण्यात येणार असून त्यांची मुंबईतच कसून चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचंही नाव जोडण्यात आलं होतं. याप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची खेडमध्ये झालेली सभा यशस्वी होण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच सुडबुद्धीनं ही कारवाई केल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं आहे.

आज सकाळी ईडीच्या पथकाने सदानंद परब यांची दापोलीतील त्यांच्या कुडेशी या गावी कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं असून सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालं आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात सदानंद कदम यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. कदम यांना ताब्यात घेण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.