दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपांनंतर राहुल कुल प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी नैराश्येतून हे आरोप केले आहेत. त्यांना वस्तुस्थितीची माहिती नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोप केले. मी २० ते २२ वर्षांपासून कारखान्याचा अध्यक्ष आहे. हा कारखाना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहे. संजय राऊत काही बोलू शकतात. हे सगळे राजकीय हितासाठी होतंय. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असंही राहुल कुल म्हणालेत. मी विधानसभेच्या हक्कभंग समितीवर आहे. राऊतांवरील कारवाईबाबत आमची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल आता बोलणं योग्य नाही, असं राहुल कुल म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
