शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार

नाशिक येथून पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला आहे. 12 मार्चला सायंकाळी हा मोर्चा सुरू झाला आहे. विविध मागण्यासाठी हा मोर्चा यापूर्वी देखील मुंबईच्या दिशेने निघाला होता. यापूर्वी दोन वेळेला हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेने केले होते. जे पी गावीत, डॉ. अजित नवले या शेतकरी नेत्यांनी केले होते. आताही पुन्हा किसान सभेच्या वतीने किसान सभेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले आहे. थेट विधानभवनावर कूच करण्यासाठी शेतकऱ्यांनी वाट धरली आहे. कुठलाही नेता आला तरी, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही अशी भूमिकाच मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बोलावण्यात आलंय. उद्या दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन बैठकीचं निमंत्रण दिलंय. राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलन पुकारलंय. शेतमालाला हमीभाव मिळावा अशा 14 मागण्या आहेत. सरकारने चर्चेला बोलावलं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर शेतकरी ठाम आहेत.

यामध्ये कांद्याला सहाशे रुपये अनुदान द्या. आणि दोन हजार रुपये दराने कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून करा अशी मागणी केली आहे. यानंतर वनजमिनीचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये चार हेक्टर पर्यन्तची वनजमीन असेल तर त्यावर शेतकऱ्याचे नाव लावून द्या अशी मागणी करण्यात आली आहे.