शीतल म्हात्रे व्हिडीओ मॉर्फ प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाला अटक

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले दोघांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

आतापर्यंत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

विनायक डायरे या 27 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरेला व्हिडिओ व्हायरल करायला दिला असल्याची माहिती आहे. विनायक डावरे मातोश्री पेज ऑपरेट करत होता. शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाच्या युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत.