राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खटके उडाल्याचे पहायला मिळाले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा अजित पवारांवर टीका केली आहे.पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला लगावलाजळगाव जिल्ह्यातील एक विवाह सोहळ्याला मंत्री पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली.
वधूचे माहेरचे आडनाव पवार होते. हे लक्षात येताच ते म्हणाले, की ‘पवारांसारखी बुद्धी कुणाचीच चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो. ते सकाळी-सकाळी कधी शपथ घेतील आणि काय करून टाकतील याचा नेम नसतो. त्यांच्या बुद्धीपुढे कुणाचेही चालत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी सोबत ठेवतो,’ असे त्यांनी म्हणताच तेथे उपस्थितांत जोरदार हास्यकल्लोळ उडाला.मंत्री पाटील यांनी याआधीही आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंच्या मागे गेलो होतो, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यांच्यावर टीकाही झाली होती.
