मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे याचा हा दौरा महत्त्वाचा आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडल्यानंतर तसंच मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला यावं,’ अशी इच्छा महंतांनी या भेटीत व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री आपल्या सर्व आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांसोबत हा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीत दर्शनासाठी जातील, अशी माहिती आहे. अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शरयू नदीवर आरतीही करणार आहेत.
