मुंबई: ‘हा सर्व हवाई पुलावा आहे. जागा वाटपाचा आणखी कुठलाही निणर्य झालेला नाही. मी एक-दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे. मला दिल्लीला बोलावतील असे अपेक्षित आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्यावर महाराष्ट्रात आम्ही नेमके काय करायचे यावर सहयोगी पक्षांशी चर्चा करून पुढे आम्ही जाऊ पण जागावाटपावरून कुठलीही चर्चा राज्यामध्ये झालेली नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
काँग्रेसला राज्यात किती जागा अपेक्षित आहे या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, मधल्या काळात मी जाणार नाही पण सध्या महाराष्ट्र्रात जी परस्थिती आहे. त्यातून लोकांच्या भावना काँग्रेस हाच एक पर्याय अशा स्वरूपाच्या आहे. महाराष्ट्र नेहमी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा राहिलेला आहे. पुरोगामी विचार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व आमच्या सहकारी पक्षांना कळतंय, ते आज काहीही म्हणाले असले तरी ते म्हणत असतात काँग्रेस शिवाय पर्याय नाही. हे सहकारी नेतृत्वाला माहिती आहे. जागावाटपात सर्वांचा सन्मान कसा राहील याचा देखील विचार आम्ही करू, त्या पद्धतीने पुढे जाऊ. हायकमांड यावर काय सूचना देते त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.
