अफजल खानशी तुलना करत रामदास कदमांची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका

खेडमधील गोळीबार मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. आता उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उद्या रविवारी खेड येथील याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार आहेत. हे नेते नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, अफजल खान जसा लाखो लोक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चाल करून आला, अगदी तसेच उद्धवजी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन खेडच्या सभेला आले होते, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. 19 मार्चला होणारी सभा ही फक्त कोकणवासीयांची असेल आणि तुम्हाला समजेल कोकणी जनता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा टोला देखील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

‘कोकणचा इतिहास असा आहे, ज्याच्या घरी आपण एक ग्लास पाणी पितो त्याची आठवण सुद्धा ठेवतो. ज्या झाडाच्या सावली खाली बसतो त्याची आठवण सुद्धा ठेवतो, असा कोकणचा इतिहास आहे. ही कोकणची संस्कृती आहे. पण भास्कर जाधव सारखी आणि खाल्लेल्या घराची वासे मोजणारी अवलाद जगात कुठेही मिळणार नाही. भास्कर जाधव म्हणजे बेईमानी अवलाद आहे असं रामदास कदम म्हणाले