आम्हीही शिवसेना-भाजप युतीत; तीन जागा हव्यात – रामदास आठवले

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे. आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का? असा सवाल उपस्थित केल्याने हा प्रश्न चांगलाच पेटणार आहे. मात्र आता प्रश्नावर रामदास आठवले यांनी दोघांची समजूत काढणार असून जागा वाटपाबाबत योग्य तो निर्णय व्हायचा असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

रामदास आठवले यांनी भाजप सेनेतील जागेच्या वरुन झालेल्या आरोप प्रत्यारोपावर भाष्य करत आम्हालाही जागा हव्या आहेत असं म्हंटलं आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीत आम्हीही आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत आम्हाला जाग्या हव्यात असे रामदास आठवले यांनी म्हंटलं आहे.आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही एकत्र राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. यामध्ये एक मंत्रीपद आणि एक विधान परिषद सदस्यत्व मिळावे अशी आमची अपेक्षा असल्याचं सांगत दोन ते तीन महामंडळ देखील मिळावे असं म्हंटलं आहे. लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने तीन जागा द्याव्यात, यात एक शिर्डी आणि एक मुंबई आणि एक इतर जागा मिळावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुका लढणार असल्याचे म्हंटले आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रीपदाबाबतही मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात आठवले यांना किती जागा आणि मंत्रिपद मिळतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.