भाषेला कधीही सीमा आणि मर्यादा नव्हत्या -भालचंद्र नेमाडे

मुंबई : भाषेला कधीही सीमा आणि मर्यादा नव्हत्या. मराठी, हिंदी, गुजराती या भाषेत काही फार मोठे फरक नाहीत; परंतु प्रादेशिक पक्षांमुळे भाषिक भेद बरेच वाढले. आपणही हा भेद अधिक करत सुटलो; मात्र भाषिक पातळीवर निर्माण झालेली दरी राजकमल प्रकाशनाच्या किताब महोत्सवातून दूर केली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी केले. राजकमल प्रकाशनच्या किताब उत्सवाच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते.

हिंदी पुस्तकविश्वात प्रसिद्ध असलेल्या राजकमल प्रकाशनच्या ‘राजकमल किताब उत्सवा’ला आजपासून वरळी येथे सुरुवात झाली. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, हिंदी साहित्यिक अब्दुल्ल बिस्मिल्लाह, राजकमल प्रकाशनचे अशोक महेश्वरी आदी उपस्थित होते. राजकमल प्रकाशनने नुकतेच ७६ वर्षांत पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर मुंबईत किताब उत्सव आयोजित करण्यात आला. यापूर्वी अलाहाबाद, वाराणसी, पाटणा, चंडीगड येथे किताब उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे महेश्वरी यांनी प्रास्ताविकेत सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, पुस्तकात चांगले काही नसेल, तर लोक टाकून देतात आणि चांगले पुस्तक राखून ठेवले जाते. पुस्तकामध्ये केवळ लेखकाचीच नव्हे, तर प्रकाशक, मुखपृष्ठकार, मुद्रितशोधक, वाचक आदी अनेकांची महत्त्वाची भूमिका असते. पुस्तक लिहिताना माझ्याजवळ आई-वडिलांची पुण्याई होती. त्याचा प्रभाव त्यावर पडला; मात्र पुस्तके लिहिणे, ती वाढवणे ही सर्वात मोठी समाजसेवा असल्याचे नेमाडे म्हणाले.