मुंबईत एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत, महाविकास आघाडीच्या हिरव्या वादळाला देणार उत्तर

मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्ष एका विशिष्ट समाजाचे मतांसाठी लांगुलचालन करीत मुंबईत हिरवे वादळ आणू पाहतेय. त्याला उत्तर म्हणून भाजप हिंदूत्वाची गुढी उभारत आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, हिंदूच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा भाजपा मुंबईच्या वतीने दणक्यात साजरा करण्यात येणार असून मुंबईत भाजपाचे कार्यकर्ते एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार आहेत,

आता हिंदू सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरे केले जात आहेत. हिंदू सणांमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे असे सांगून शेलार म्हणाले, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती आदी सण उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले. नुकतेच ‘जाणता राजा’ महानाट्याच्या सादरीकरणालाही मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सुमारे १ लाख नाट्य रसिकांनी या महानाट्य पाहिले. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांत भाजपा नेते, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मिरवणुका देखील आयोजित करण्यात येणार आहेत. लालबाग, परळ, वरळी, विलेपार्ले, बोरिवली, दहिसर या भागात या शोभायात्रा काढण्यात येणार आहेत.

भाजपा देशातील सर्वांत मोठा सेवाकार्य करणारा पक्ष आहे. हिंदू संस्कृतीचा समृध्द वारसा पुढे नेला जात आहे. गुढी म्हणजे विजय पताका असून प्रत्येक हिंदू बांधवांनी गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करत खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची गुढी उभारावी असे आवाहन शेलार यांनी केले.