डोंबिवली : राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मिळत आहे. हे डबल इंजिन सरकार सामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आणणार आहे. राज्याचा सर्वांगीण विकास आणि सामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल हाच आमचा अजेंडा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित २५ व्या नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वांच्या उन्नत्तीचा आहे. मराठी, हिंदी कलाकारांच्या पाठीशी हे सरकार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. डोंबिवलीतील नागरिक खूप प्रेमळ आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे या भागात पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, त्यावेळेपासून डोंबिवलीतील नागरिकांनी जी साथ दिली, प्रेम दिले ते कधीही विसरणार नाही, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मागील आठ महिन्याच्या कालावधीत आमच्या सरकारने राज्याच्या विकासाचे धाडसी आणि जलद निर्णय घेतले. अशाप्रकारचे निर्णय घेणारे हे देशातील पहिले राज्य आणि सरकार आहे. असे धडाकेबाज निर्णय घेऊन राज्य प्रगतीपथावर नेण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात आपण सगळे घरात बसून उत्सव करत होतो. आता मात्र जाहीरपणे ते करायला लागलो आहोत हा सकारात्मक बदल आपल्या सरकारने करून दिला हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे असेही ते म्हणाले.
