डोंबिवली : गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसेच्या शाखेला देखील भेट दिली. यावेळी राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत स्वागत केलं. यासंदर्भात बोलताना राजू पाटील म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना विनंती केली, साहेब…ऑफिस बाजूलाच आहे, तुम्ही येता का?, यावर एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो चालेल, असं म्हणत होकार दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने लोक सभेला येतील असं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपण गुढी पाडव्याच्या सभेत सर्व काही बोलणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज डोंबिवलीत शोभायात्रेच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले असता अचानक मनसेच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी वळसा घालून मनसेच्या कार्यालयात हजेरी लावल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीमधील मनसेच्या कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांनी विनंतीला मान दिला. ते कार्यालयात आल्यानं आनंद झाला. हिंदुत्वाचा विचार आमचा सुरुवातीपासूनच आहे. आता याही पक्षाचा विचार हा हिंदुत्वाचा आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकांसाठी युती होणार का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांनी एकत्र यावे का हा निर्णय राज साहेब घेतील, मात्र माझे व्यक्तीगत मत म्हणाल तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वतंत्र लढलो तर कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, पण राज साहेब बोलले तर एकत्र येऊ असं सूचक विधान राजू पाटील यांनी केलं आहे.
