राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडून विकासकाम बंद पाडण्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्त्यासह कामगारांना मारहाण

पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह त्यांच्या सहा कार्यकर्त्यांवर विकासकाम बंद पाडण्याचा प्रयत्न करत भाजप कार्यकर्त्यासह कामगारांना मारहाण केल्याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन दोडके याने 2019 मध्ये खडकवासला मतदासंघांतून भीमराव तापकीर यांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती.
आरएमडी कॉलेज ते साई सयाजी नगरमधील अंडरपासचे काम सुरू असताना दोडके यांनी गोंधळ घालत काम थांबून कामगारांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


सचिन दोडके, संजय दोडके यांच्यासह सहा जणांना विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी भाजपाचे पुणे शहर सरचिटणीस वासुदेव शिवाजी भोसले (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. वासुदेव भोसले यांचा बांधकाम व्यवसाय आहे. ते भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस म्हणून सामाजिक काम करतात. आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीमधून आरएमडी कॉलेज ते साई सयाजी नगरमधील अंडरपासमध्ये काम सुरू आहे. हे काम सुरू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी नगरसेवक सचिन दोडके आणि अन्य आरोपी त्या ठिकाणी आले.


भोसले यांना शिवीगाळ करून त्यांचे हातपाय तोडण्याचे आणि वारजात राहू न देण्याची धमकी दिली. या सोबतच हातामध्ये बांबू घेऊन कामगार आणि पेंटर यांना शिव्या करून मारहाण केली. तसेच, कलर फेकून देऊन नुकसान केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.