संजय राऊतांवरील हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार ; राज्यसभेचा अभिप्राय घेण्यात येणार

संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कार्यवाहीचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेकडून संजय राऊत यांचे हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. राऊतांवरील कार्यवाही संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेणार आहे. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. राज्यसभेच्या या अभिप्रायाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. याला राऊतांनी उत्तर दिले होते. हक्कभंग समितीविषयी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र पाठवत राऊतांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेतला आहे. हक्कभंग कारवाईबाबत गठीत केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरुपाची असणं अपेक्षित होतं. पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते, असं संजय राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर आता हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात आले आहे.