संघावर हत्येच्या आरोपापासून मोदी – शहांच्या बदनामीपर्यंत राहुल गांधी यांच्यावर आहेत सहा खटले सुरू

मोदी समाज बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण हा केवळ एकच खटला नाही तर बदनामीचे आणखी सहा खटले दाखल आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हत्येच्या आरोपाचाही गंभीर खटला आहे. सर्व चोरांचे मोदींचं आडनाव का आहे’ या वक्तव्यामुळे मानहानी प्रकरणी राहुल गांघी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाकडून शिक्षा झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. याचप्रकारे राहुल गांधी यांच्यावर सहा वेगवेगळे मानहानीचे खटले दाखल आहेत. राहूल गांधी यांनी संघावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप केला होता.6 मार्च 2014 रोजी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका निवडणूक सभेत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. ज्या आरएसएसच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली आणि आज ते गांधीजींबद्दल बोलतात, असे ते म्हणाले होते.या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भिवंडी विभागाचे राष्ट्रीय सचिव राजेश कुंटे यांनी 2018 मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.

डिसेंबर 2015 मध्ये, आसाममधील आरएसएस स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. या संघ स्वयंसेवकाने दावा केला होता की, आपण आरएसएसशी संबंधित असल्यामुळे त्यांना आसाममधील बारपेटा सत्रा येथे जाण्यापासून रोखण्यात आले.23 जून 2018 रोजी केलेल्या ट्विटच्या आधारे राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित शाह यांचे अभिनंदन, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांनी ट्विट केलं होतं की, ”तुमच्या बँकेला 750 चं प्रथम पारितोषिक मिळालं. ज्या लाखो भारतीयांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले, नोटाबंदीच्या तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतो.

नोव्हेंबर 2018 मध्ये, महाराष्ट्र भाजप नेते महेश श्रीश्रीमल यांनी राहुल यांच्या ‘कमांडर-इन थीफ’ टीकेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राहुल गांधी यांनी राफेल विमान सौद्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला होता. यावरून महेश श्रीश्रीमल यांनी खटला दाखल केला होता. काही दिवसांच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये, राहुल आणि सीपीआय(एम) जनरल सीताराम येचुरी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि वकील धृतिमान जोशी यांनी हा खटला दाखल केला आहे.धृतिमान जोशी यांनी याचिकेत म्हटले आहे की, पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येनंतर 24 तासांनंतर राहुल यांनी वक्तव्य केलं होतं की, जर कोणी आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणी विरोधात बोलत असेल तर त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यावर दबाव आणला जातो. त्याला बेदम मारहाण केली जाते. त्यांच्यावर हल्ले केले जातात, त्यांना मारलं जाते.