जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जालना आणि अंबड शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जालना जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अभिषेक कृष्णा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जालना शहर राज्यातील व मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करण्यात येईल. यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. योजनेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कोणत्याही योजनेबाबत, प्रकल्पाबाबत शाश्वत विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रस्ताव सादर करण्यात यावेत. जेणेकरून संबंधित योजना, प्रकल्प स्वयंपूर्ण होतील. शहरातील अन्य सुविधांच्या प्रस्तावासंदर्भाही लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.