आपल्या कामाची दाद मागण्यासाठी आलेल्या तीन जणांनी सोमवारी एकाच दिवशी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी उपचारादरम्यान विष घेतलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी संध्याकाळी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात लिहिण्यात आले आहे की, सामान्य नागरिकांना कधी आणि किती वाजता भेटणार याबाबत माहीती मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा.
तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून तशी वेळ राखून ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी केले. मंत्र्यांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातील ठरावीक दिवस व वेळ निश्चित करावी. त्याची कल्पना अभ्यागतांना यावी, म्हणून भेटीचा दिवस व वेळेची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा. लाेकांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका, असे निर्देश दिले आहेत.
