राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा सातत्याने अपमान झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांना उपरती होऊन काँग्रेसला इशारा द्यावा लागल. मात्र ठाकरेंचे हे मगरीचे अश्रू असून सावरकरांविरुध्द टिकेची मुक्ताफळे उधळणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांना ठाकरे पिता पुत्रांनी खासदारकीची बक्षिसी दिली आहे.
सावरकरांचा अपमान केल्यावरून काँग्रेसला इशारा देत असताना आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे सावरकरांबाबत काय विचार आहेत हे पाहण्याची तसदी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी घेतली नाही. 2019 मध्ये मुंबईमध्ये काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदाचीही जबाबदारी दिली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक ज्येष्ठांना डावलून राज्यसभेची खासदारकीही बहाल केली. मात्र यावेळी चतुर्वेदी यांचे सावरकरांविषयी काय विचार आहेत हे पहिले नाही. सावरकरांवर चतुर्वेदी यांनी अनेकदा वाईट भाषेत टीका केली आहे. अगदी सावरकर म्हणजे बलात्कारी विचारधारा म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते, भक्त बलात्काराच्या धमक्यांचा बचाव करतात यात आश्चर्य नाही. हिच तर सावरकर विचारधारा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरांचा गौरव करणारा एक ब्लॉग लिहिला होता. त्यावर टीका करताना चतुर्वेदी यांनी म्हटले होते की अमित शहा यांनी सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचा गौरव केला आहे. सावरकर हे स्वातंत्र्य चळवळी च्या विरोधात होते असाही आरोप त्यांनी केला होता.
चतुर्वेदी यांनी सावरकरांविषयीच्या आपल्या विचारांमध्ये बदल झाल्याचे कधी सांगितले नाही. ठाकरेंनीही त्यांना याबाबत विचारले नाही. उद्धव ठाकरे यांना कदाचित माहीत नसेल पण आदित्य ठाकरे नेहमी प्रियांका चतुर्वेदी यांचे ट्विट लाईक, रिट्वीट करत असतात. सावरकर विरोधीच नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही चतुर्वेदी यांनी टीका केली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापौरांचा बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. टीका करताना बाळ ठाकरे स्मारक असा शब्दप्रयोग करत सत्तेत राहण्यासाठी तडजोडीची किंमत म्हणून हा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. गौरवशाली वारसा असलेली वास्तु बाळ ठाकरे स्मारकासाठी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.
