कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. महानगरपालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर परदेशातून येणाऱ्यांची चाचणीही केली जाणार आहे.
देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने अलीकडेच सर्व अधिकारी आणि करोना राज्य कृती दलासोबत आढावा बैठक घेतली. परदेशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच चीन आणि दुबईमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना कारोना राज्य कृती दलाने राज्य सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाला केल्या आहेत.
राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण 24 डिसेंबरपासून सुरुच आहे. राज्यात दररोज सरासरी 6 हजार 204 चाचण्या केल्या जातात. काही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. सोलापुरातील पाॅझिटिव्हीटी रेट 20.05 टक्क्यांवर तर सांगलीत पॉझिटिव्हिटी रेट 17.47 टक्क्यांवर आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या 80 टक्के ॲक्टिव्ह रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिकमध्ये आहे.
