छत्रपती संभाजीनगर येथे उद्या (२ एप्रिल) रोजी महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडणार आहे. या सभेवरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं असून या सभेमुळे संभाजीनगरमधील परिस्थिती चिघळल्यास त्याला आयोजक जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला. एका वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
दरम्यान याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, ज्या मैदानात महाविकास आघाडीची सभा होता आहे, त्याच मैदानात शिवसेनाप्रमुखांना मी जवळून पाहिलं होतं. कारण त्यावेळी त्या सभेचं सूत्रसंचालन मी केलं होतं. कुठेही जाहिरात, बॅनर नसताना लाखोंचा जनसमुदाय मैदानावर एकत्र आला होता. आता त्याच ठिकाणी महाविकास आघाडीची सभा होत असून, जेथून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा यज्ञकुंड पेटवला होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करण्याचं काम या सभेच्या स्टेजवर होणार आहे.
