महाविकास आघाडीत आंबेडकरांना नो एन्ट्री, तिसऱ्यात चौथ्याला शरद पवारांचा विरोध

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यात विरोध असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱ्यात चौथा नकोच सांगताना पवारांनी आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

शिवशक्ती-भीमशक्तीची घोषणा करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी केली आहे. मात्र आंबेडकर यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत अत्यंत कडवट मते आहेत. शरद पवार यांच्यावर ते नेहमी जहरी टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर एका वाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले, ”आत्ता महाराष्ट्रात जी तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामध्ये आणखी कोणी चौथा असेल असं दिसत नाही. कुणालाही अॅडजेस्टमेंट करावी लागत असेल तर त्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन करावं लागेल. स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन त्या-त्या ठिकाणी कार्य करावे लागेल”, असं म्हणत एक प्रकारे शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत कोणतेही स्थान नाही ”, असेच संकेत दिले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपण चर्चा करणार का? यावर पवार म्हणाले की, ”तसा कुठलाही विषयच येत नाही. माझ्या पक्षातील काही सहकारी असतात. त्यांच्याही पक्षातील काही सहकारी असतात. ते चर्चा करत असतात.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उलट भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यावरून पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्याने उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.