मुख्यमंत्रीपदाची चर्चा माझी बदनामी करण्याचे षडयंत्र, राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

नगर : मुख्यमंत्रीपदाची चर्चा हे मला बदनाम करण्यासाठीचे षडयंत्र आहे. कपोलकल्‍पीत बातम्या दिल्या जात आहेत, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यावर विखे पाटील म्हणाले, “माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्‍त हे कपोलकल्‍पीत आणि मला बदनाम करण्‍याचे षडयंत्र आहे.

अशा वावड्या पसरविण्‍याचे काम काही मंडळी करीत आहेत. माझी बदनामी करण्‍याच्‍या हेतू आहे. यामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही, राज्‍याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या माध्‍यमातून सक्षम नेतृत्‍व मिळाले आहे. राज्‍याचा हा निर्णय पंतप्रधानांच्या स्‍तरावर झाला असल्‍याने यामध्‍ये कुठलीही विसंगती असण्‍याचे कारण नाही.

अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे सांगताना विखे पाटील म्हणाले, विरोधक देशातील गुंवणूकदारांचे झालेले अर्थिक नूकसान भरून देणार आहेत काॽ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा आलेख उंचावत आहे. मोदींच्या यशस्वी कारकीर्दीवर विरोधकांना कुठेही बोट ठेवायला जागा नाही. आज जगातील कित्येक भांडवलदार देश अडचणीत असताना भारतात खासगी उद्योगांच्या माध्यमातून होत असलेली गुंतवणूक उद्योग व्यवसायाची प्रगती महत्वपूर्ण आहे.

त्‍यामुळेच भारताची प्रतिमा जगामाध्‍ये आज वेगळ्या स्‍वरुपात पाहायला मिळत आहे. परंतु हिंडनबर्ग सारखी कोणतीतरी संस्‍था येवून अहवाल देते आणि एखाद्या उद्योग समूहाला बदनाम करण्याचा प्रयत्‍न होतो. न्यायालयाने यासाठी समिती नेमली आहे. समितीचा काय अहवाल यायचा तो येईल. परंतु जेपीसीच्या मागणीवरुन संपूर्ण संसद आणि देशाला वेठीस धरण्‍याचे विरोधकांचे सुरु असलेले काम हे फक्‍त पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्‍यासाठी आहे. विरोधकांचे हे कारस्‍थान कदापिही यशस्वी होणार नाही.