राजस्थान विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना सत्ताधारी काँग्रेसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड झाली आहे. वसुंधराराजे सरकारने केलेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यात मुख्यमंत्री अशोक गहलोत टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप त्यांचेच सहकारी सचिन पायलट यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी सरकारने आधीच्या सरकारवर कारवाई करावी या मागणीसाठी पायलट मंगळवारी एक दिवसाचे उपोषणही करणार आहेत. पायलट यांच्या या भूमिकेला गहलोत मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने पाठिंबा दिला आहे.
पायलट यांचे असे म्हणणे आहे की, ‘सत्तेत आल्यास वसुंधराराजे सरकारने केलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याची चौकशी करू, असे आश्वासन आम्ही दिले होते. परंतु, निवडणुकीस आता केवळ सहा ते सात महिन्यांचा कालावधी उरला असूनही गहलोत सरकारने त्याविषयी काहीच केले नाही.
‘एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने आम्ही तेव्हा भाजपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता व त्यामुळेच भाजपला सत्ता गमवावी लागली. परंतु आम्ही सत्तेत आल्यानंतर त्या घोटाळ्याची चौकशी झाली नाही. याविषयी मुख्यमंत्री गहलोत यांना गेल्या वर्षी २८ मार्च व दोन नोव्हेंबरला मी पत्रे लिहिली. परंतु, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. ही चौकशी व्हावी या मागणीसाठी मी ११ एप्रिलला शहीद स्मारक येथे एक दिवसाचे उपोषण करणार आहे,’ असे पायलट यांनी सांगितले.
‘मी व गहलोत दोघांनी मिळून भाजपवर आरोप केले होते. त्या घोटाळ्याची योग्य प्रकारे चौकशी झाल्यानंतर ते आरोप निराधार होते असे सिद्ध झाल्यास आम्ही खोटे ठरलो हे आम्ही स्वीकारू. परंतु, या प्रकरणी एफआयआर दाखलच झाला नाही, तर सर्वसामान्य नागरिक या आरोपांवर विश्वास कसा ठेवतील,’ असा प्रश्न पायलट यांनी उपस्थित केला.
गहलोत सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठामंत्री प्रतापसिंग खाचरियावास यांनी पायलट यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला. ‘पायलट यांची मागणी योग्य आहे. भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात सरकारने कारवाई करायलाच हवी. सचिन पायलट हे आपल्या पक्षाची संपत्ती आहेत, असे राहुल गांधी यांनीच म्हटले होते,’ असे ते म्हणाले.
