गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉटचा वाद, अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याची भाजपच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

पुणे : गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉटचा वादातून आपल्याला धमकीचे फोन येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र सळगावकर यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी या प्रकरणात अजून कुठलीही कारवाई केलेली नाही. चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय पोलीस घेणार आहेत.

गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही बळजबरीने मोजणी केली जात होती. या प्लॉटचा ताबा सध्या साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे.या तक्रारीत साळगावकर यांनी सांगितले आहे की, याबाबत हवेली तहसीलदार यांच्याकडेही यापूर्वी अर्ज दाखल केला आहे. तसेच चतुशृंगी पोलीस ठाण्यातही अर्ज दिला आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव असल्याने शासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. याबाबत पोलिसांच्या नियंत्रण कक्षास मी मला धमकीचे फोन येत असून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र, तरीही मला अद्याप उत्तर दिले गेलेले नाही.या फाईलला अजित पवार यांचे नाव असल्याने, यामध्ये माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही फाईल कोणत्याही विकास कामाची नसून मोकळ्या प्लॉटच्या संदर्भात आहे. त्यामुळे मला असे वाटते की, माझ्या जीवाला अजित पवार यांच्याकडून धोका आहे. याबाबत पोलिसांनी सखोल तपास करावा अशी माझी मागणी आहे, असे साळगावकर यांनी म्हटले आहे.