राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार भाजपत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संपर्काचं नात्यामध्ये परिवर्तन होण्याची वेळ यायची आहे. ही वेळ येईल निवडणुकीच्या तोंडावर, असे त्यांनी सांगितल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीमध्ये सध्या निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तक या वृत्तसंकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. एका बाजूला महाविकास आघाडी वज्रमूठ नावाने सभा घेत असताना कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न या तिन्ही पक्षात निर्माण झाला आहे.
फडणवीस म्हणाले, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. राजकारणात काहीजण सोबत असतात, काही विरोधक असतात. पण, काही मुद्दे तत्वांशी निगडित असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कधी सांगायची याची एक योग्य वेळ असते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या आमदारांबाबत विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, संपर्कात नेहमीच असतात. कारण सत्तारुढ पक्षात काम करत असताना आपण संबंध निर्माण करतो. त्यासंबंधामुळे आणि आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक लोक सोबत येतात. गेल्या पाच वर्षात अनेक लोक आले. त्यामुळे संपर्कात अनेक लोक आहेत, त्यातील किती लोक येतील हे आज पक्क सांगता येणार नाही. आमदार संपर्कात असतातच.
