रश्मी ठाकरे राजकीय मैदानात, नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल करणार!

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आता राजकीय मैदानात उतरणार आहेत. नाशिक मध्ये त्यांचा पहिला महिला मेळावा होणार आहे. गेल्या काही दिवसात नाशिक मध्ये ठाकरे गटाला अनेक हादरे बसले. त्याचे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न रश्मी ठाकरे करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या निर्णय प्रक्रियेवर मोठा प्रभाव असला तरी आतापर्यंत रश्मी ठाकरे या पडद्याआडच होत्या. ठाकरे गटाच्या अनेक कार्यक्रमांना त्या उपस्थित असत. मात्र त्यांनी कधी भाषण केले नाही. नाशिक मधील महिला मेळाव्यात मात्र त्या भाषण करणार आहेत.

एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हातून गेलेली सत्ता या सर्व घडामोडी घडत होत्या. आणि या आणीबाणीच्या परिस्थितीत रश्मी ठाकरे या मैदानात उतरल्या. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे या नाशिकमध्ये महिला मेळावा घेणार आहेत. रश्मी ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये महिला मेळावा घेणार आहेत.

शिवसेना हे नाव आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर पक्षबांधणीसाठी ठाकरेंकडून जोरदार तयारी केली जात आहे. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या नावाची ब्रॅंडिंग सुरु करण्यात आली होती. तेजस ठाकरे मैदानात उतरणार असे बोलले जात होते. मात्र आता तेजसऐवजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. रश्मी ठाकरे या अनेक राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. मात्र त्या कधी थेट सक्रिय राजकारणात उतरलेल्या दिसल्या नाहीत. रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे.