बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

आम्ही बाबासाहेबांच्या स्मारकाला प्राधान्य देत आहोत. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी बाबासाहेबांना चैत्यभूमीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री स्वत:हून यामध्ये लक्ष घालत आहेत. ते दर १५ दिवसांनी या स्मारकाच्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे लवकरच स्मारक पूर्ण होईल. जगाला हेवा वाटेल, असे बाबासाहेबांचे स्मारक बनवू, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना भारतातील अस्पृश्यतेच्या प्रश्नावर भाष्य केलं. “त्याकाळी आपल्याच समाजात काही लोक स्वतःला मोठं समजत होते आणि इतरांना माणूसकीची वागणूक देत नव्हते. अशा काळात मानवतेचा संदेश घेऊन समतेचं राज्य आहे, येथे कुणीही जन्माने मोठं होणार नाही, कर्माने मोठं होण्याची प्रत्येकाला संधी मिळेल, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला.” “आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा वारंवार घेतली पाहिजे. त्याच मार्गाने भारत देश जगातील सर्वोत्तम देश होऊ शकतो,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्ववेत्ते होते, समाजसुधारक होते, अर्थशास्त्री होते, दुरद्रष्टे होते. त्यांनी १०० वर्षांपूर्वी ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ हे पुस्तक लिहिलं. १०० वर्षांनी आज आपण या पुस्तकात डोकावून पाहतो, त्यावेळी लक्षात येतं की, ही व्यक्ती किती द्रष्टी होती.”

“आपल्या रुपयाची काय अडचण आहे, महागाई का होते, त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काळा पैसा कसा जमा होईल, त्या काळ्या पैशांपासून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे,” असंही देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.