संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, लोक सकाळी 9.30 टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर येड्यासारखा बडबडबतो. म्हणून लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनानिमित्त मुंबईतील एका कार्यक्रमात आशिष शेलार बोलत होते. तर हिंमत असेल तर संजय राऊत यांनी माझ्या घराखाली यावं, त्यांना मी 40 लोकांचे सर्टिफिकेट देतो, असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलंय.
आशिष शेलार म्हणाले, लोकशाही धोक्यात आहे असा अपप्रचार किमान संजय राऊत यांनी करू नये. संविधानामुळे ते आज जामिनावर आहेत. काही लोकांना अंतरीम सुरक्षा वाढवून मिळत आहे. ज्यांना ही सुरक्षा वाढवून मिळतेय त्यांच्यावर पण आमचे लक्ष आहे, असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर भाजपचं विशेष लक्ष आहे. या मतदार संघातून भाजपचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे, यासाठी मोठे प्लॅन आखले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे वरळीत लेजर शो आयोजित करण्यात आलाय. मात्र हा राजकीय अजेंड्याचा भाग आहे, असं शेलार यांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले, ‘ समस्त भारतीयांना साजरा करायचा दिवस आहे. स्वातंत्र्य,समता, बंधुता असा संदेश ज्यांनी दिला, त्या बाबासाहेब यांची जंयती जल्लोषात साजरी होत आहे. आम्ही वरळीत भव्य लेझर शो करत आहोत. यात्रा काढतोय. वरळीत लेझर शो करण्याचे विशेष राजकीय कारण नाही. जांबोरी मैदानात समाज एकत्रित येतो. तो भाग मध्यवर्तीय आहे. त्यामुळे तिथे कार्यक्रम घेत आहोत, असंही शेलार यांनी स्पष्ट केलंय.
देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर टीका
भाजपची ‘वज्रमूठ’ ही विकासाची ‘वज्रमूठ’ आहे. तर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही तडा गेलेली आहे. महाविकास आघाडीचे तीन तोंड तीन वेगळ्या दिशेला आहेत. त्यांचा एक भोंगा सकाळी नऊ वाजता वाजतो. दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी बारा वाजता वाजतो. तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळंच काहीतरी बोलतो. त्यामुळे हे लोक राज्यातील जनतेसाठी काहीही करु शकत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
