सचिन वाझे प्रकरण : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शरद पवारांकडे केली होती तक्रार!

मुंबई : सचिन वाझे म्हणजे लादेन तर नाही ना अशा शब्दात विधानसभेत त्याचे समर्थन उद्धव ठाकरे यांनी केले होते. सचिन वाझेला पोलीस नोकरीत कोणी परत घेतल्यावर आपण त्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाझेला पोलीस नोकरीत उद्धव ठाकरे यांनीच घेतले असल्याचे स्पष्ट असल्याने राऊत यांनी त्यांचीच तक्रार पवारांकडे केली होती, अशी चर्चा आहे.

राऊत याबाबत म्हणाले, मला वाझेबद्दल माहिती नाही. जेव्हा मला कळाले की वाझेला नोकरीत घेतले आहे. तेव्हा मी पहिला माणूस होतो जो शरद पवारांना भेटला. हा चुकीचा माणूस आहे. हा निर्णय आपल्याला थांबवायला हवा असं त्यांना सांगितले. सचिन वाझेमध्ये सरकारला अडचणीत आणण्याची क्षमता आहे. यात काहीतरी गडबड आहे. माझ्यासोबत २ आमदार होते. पवारसाहेब तुम्ही हस्तक्षेप करा, या माणसामुळे भविष्यात आपले सरकार अडचणीत येईल असं मी बोललो होतो. त्याचसोबत सचिन वाझेला मी गेले ३० वर्ष ओळखतो.

महाविकास आघाडी म्हणून मी शरद पवारांच्या कानावर ही गोष्ट घातली होती. मला कळाल्यानंतर २४ तासांत पवारांना कळवले. त्याला कुणी घ्यायला सांगितले ते मला माहिती नाही. कारण या प्रशासकीय गोष्टी आहेत. माझा याच्याशी संबंध नाही, असेही राऊत म्हणाले.

ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझे
17 वर्षे निलंबित होता. 2008 सालच्या दसरा मेळाव्यात सचिन वाझेने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्याची विनंती केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र त्यावेळी वाझेला पोलीस दलात घेण्यात आले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर वाझेला केवळ पोलीस दलात घेण्यात आले नाही तर गुप्तचर विभागाचा प्रमुख करण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारवाल्यांकडून महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश वाजे यालाच दिले होते.