नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या बेभरवशी राजकारणाचे उदाहरण पुन्हा एकदा दाखविले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्नाटकात काँग्रेसचा बाजार उठविण्यासाठी तयारी केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार म्हणाले की, राज्यातील विधानसभेच्या 224 जागांपैकी त्यांचा पक्ष 40 ते 45 जागा लढवणार आहे. निवडणूक लढवण्याचे कारण राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी उचललेले पाऊल आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील. मात्र राजकीय तज्ञांच्या मते पवारांची यामागे मोठी खेळी आहे.
सध्या कर्नाटकात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. भाजपचे अनेक नेते काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस चांगले यश मिळविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कर्नाटकात फारशी ताकद नाही. पण चुरशीच्या लढतीत काही हजार मतांमुळे फरक पडू शकतो. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका नेत्याने सांगितले की, पवार यांची काँग्रेसला डॅमेज करण्याची ही जुनी सवय आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत 2017 साली काँग्रेसला चांगले वातावरण होते. त्यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे केले. त्यांनी घेतलेल्या मतांमुळे अनेक ठिकाणी काँग्रेसचा निसटता पराभव झाला.
विशेष म्हणजे शरद पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती.
खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. भेटीनंतर राहुल म्हणाले होते की, आम्ही सर्व एक आहोत. त्याचबरोबर देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकजुटीने लढण्यासाठी सज्ज आहोत, असे खरगे म्हणाले.
त्याच खरगे यांचे राज्य असलेल्या कर्नाटकात पवार यांनी ही खेळी केली आहे. कर्नाटकात 10 मे रोजी निवडणूक होत आहे. भाजप, काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात तिरंगी लढत होण्याचा अंदाज आहे.
