नागपूर : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यासाठी पाठदुखीचे कारण देण्यात आले होते. मात्र सभेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे ठाकरेंची पाठदुखी पळाली आहे. नागपूरच्या सभेत व्यासपीठावर सर्वांसाठी समान खुर्ची ठेवण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असोत की काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, व्यासपीठावर मोठी खुर्ची ठेवली जात नाही. सभेच्या तयारीच्या वेळीच ठाकरे यांनाच जादा महत्व दिले जात असल्याचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले होते. याची माहिती नेत्यांना देण्यात आली होती. इतर नेत्यांनी त्याची दखल घेतली नाही तरी नाना पटोले यांनी मात्र हे गांभीर्याने घेतले.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ठाकरे यांना पाठदुखी असल्याने मोठी खुर्ची दिली असे सांगितले होते. नागपूर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीचे सभेसाठी सर्वच नेत्यांना सारख्या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. आता उद्धव ठाकरेंची पाठदुखी कुठे पळाली हा प्रश्न केला जात आहे.
