महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. देशातले अनुभवी नेते शरद पवार यांच्यासहित सगळेच नेते नव-नवीन भाकितं करत आहेत. या सगळ्या दाव्यांचा केंद्रबिंदू आहेत अजित पवार. आत काहीतरी घडतंय, ज्याचे परिणाम थेट महाराष्ट्राचं राजकारण बदलण्यात होतील, असं म्हटलं जातंय. गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झालेले अजित पवार आज पुन्हा एकदा एकाएकी कार्यक्रमांना गैरहजर राहिलेत. प्रकृती अस्वस्थ्याचं कारण दिलं जातंय. पण अजित पवार कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी तर या पक्षप्रवेशाचा दिवस कधी आहे, हेदेखील सांगितलंय.
‘अजित पवार हे 33 महिन्यांच्या सरकारला कंटाळलेले होते. त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता. तर देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांना विश्वास आहे. तसेच उद्धव ठाकरेच्या एकेरी धोरणामुळे अजित पवार कंटाळलेले होते. त्यामुळे लवकरच अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन सरकारला पाठिंबा देतील.’ अजित पवार हे शरद पवार यांच्याच परवानगीने भाजपात येतील असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे.
तसंच, ‘शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरील हात काढला तर उद्धव ठाकरेंसोबत दोन आमदार सुद्धा राहणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली. ‘जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी, अमित शहा हिरवा कंदील देतील तेव्हा अजित पवार हे भाजपसोबत जातील. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हिरवा कंदील केव्हाही देऊ शकतात तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल होतील.’ असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
