आजपासून गोव्यात होऊ घातलेल्या जी-20 परिषदेच्या आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या अंतर्गत होणाऱ्या बैठकीत तीन प्राधान्यक्रमांवर विस्तृतपणे चर्चा होणार आहे, असे काल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अगरवाल यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.
या तीन प्राध्यान्यक्रमांमध्ये आरोग्यविषयक आणिबाणीच्या स्थितीला प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद (एक आरोग्य आणि प्रतिजैविक प्रतिबंधावर लक्ष केंद्रीत) तसेच सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि किफायतशीर वैद्यकीय प्रतिकार (लस, उपचार आणि निदान) यांची सुगम्यता आणि उपलब्धतेवर लक्ष केंद्रीत करून औषध निर्मित क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे, त्याचबरोबर डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाय व सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती आणि आरोग्य सेवा वितरण सुधारण्यास मदत करणे यावर भर देण्यात येणार आहे, असे अगरवाल यांनी सांगितले.
भारताच्या जी- २० अध्यक्षतेच्या हेल्थ ट्रॅकमध्ये आरोग्य कृतिगटाच्या चार बैठका आणि एक आरोग्य मंत्रिस्तरीय बैठक यांचा समावेश असेल. जी -२० चर्चा समृद्ध, पूरक आणि सहाय्यक बनवण्याच्या उद्देशाने आरोग्य कृतिगटाच्या बैठकीच्या निमित्ताने चार अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना भारताने आखली आहे. १८ – १९ एप्रिल २०२३ रोजी गोवा येथे आरोग्य कृतिगटाच्या दुसऱ्या बैठकीनिमित्त डिजिटल आरोग्यावर एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल. देशभरात विविध ठिकाणी या बैठका आयोजित केल्या जातील. भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणे हा यामागचा उद्देश आहे, असेही अगरवाल यांनी सांगितले.
