संशय वाढला; अजित पवारांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

महाविकास आघाडीत अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने या संशयात भार पडली आहे. त्यातच अजित पवार यांच्याऐवजी शरद पवार एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने तर्क वितर्क सुरू झाले आहेत.

आज सासवड येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला अजित पवार आले नाहीत. आज सकाळी 8 वाजेपासून वडकी, फुरसुंगी या भागातील काही दुकानांचे उद्घाटन अजित पवार करणार होते, त्या ठिकाणीही अजित पवार आलेले नाहीत सासवड येथील मेळाव्याला अजित पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे अचानक समजल्याने नागरिकांमध्येही तर्क वितर्क सुरू झाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित राहणार आहेत.

सासवड येथील मेळाव्यानंतर अजित पवार हे सोमवारी सकाळी 9.30 वाजता वडकी येथे अविनाश कैलास मोडक आणि शिलाताई अविनाश मोडक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार होते. त्यानंतर दिवे (श्री कातोबा हायस्कूल) येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या बैठकीला अजित पवार हजेरी लावणार होते. सकाळी सव्वा दहा वाजता दिवे येथून मोटार सायकल रॅली करून वनपुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे अजित पवार उद्घाटन करणार होते. त्याचवेळी नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन करून पावणे अकरा वाजता भिवरी येथे साठवण बंधाऱ्याचे व जोड रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन ते करणार होते. त्यानंतर हॉटेल आमराई 69 रिसॉर्टचे उद्घाटन होणार होते. सकाळी साडे अकरा वाजता सासवड पालखी मैदान येथे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी व युवक मेळावास ते उपस्थित राहणार होते. मात्र हे सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत.