अजित पवार यांचा एवढा सणसणीत टोला, तरी सुद्धा पुन्हा सकाळी तोंड वर करून बोललेच, शंभूराजे देसाई यांचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : आमचे वकीलपत्र कोणी घ्यायची गरज नाही. एवढा सणसणीत टोला अजित पवार यांनी लगावला. तरी सुद्धा पुन्हा सकाळी तोंड वर करून म्हणतायेत मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही एका पेपरचे संपादक आहेत. अशी भाषा तुम्हाला शोभत नाही, असा निशाणा उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर साधला.
पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, संजय राऊत कुठल्या पक्षाचे विश्वप्रवक्ते आहेत तर ठाकरे गटाचे. पण ते कोणत्या पक्षावर बोलत आहेत तर राष्ट्रवादीवर. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचेही विश्वप्रवक्तेपद द्यायला हरकत नाही. सकाळी 10 वाजता उठायचे आणि वाहिन्यांवर जाऊन मोठ्या गप्पा मारायच्या. स्वतः काही करायचे नाही आणि जे करतात त्यांच्यावर टीका करायची. राऊत यांच्या वक्तव्याला आम्ही जास्त महत्व देत नाही.


देसाई म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगले काम करत आहेत हे राऊतांना बघवत नाही. कामे झाली नाही म्हणतात. राज्यातील जनतेचा कळवळा आणतात. आठ दिवसांपूर्वी राज्यात गारपीट झाली. पण संजय राऊत एका शेतकऱ्याच्या शेतावर गेलेत का? महाराष्ट्रातील एक शेतकरी मला दाखवा की ज्याने सांगितले विश्व प्रवक्ते संजय राऊत माझ्या शेतावर आले. माझ्या शेताची पाहणी केली. मला धीर दिला.


आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण राज्य सरकारने दिला. अतिशय नेटके नियोजन केले होते. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 25 समित्या केल्या होत्या. श्रीसेवकांनाही त्यांच्या मदतीला दिले होते. दुर्दैवाने उष्णता वाढली. त्यामुळे लोकांना त्रास झाला. नाना पटोले यांनी याचे राजकीय भांडवल करू नये. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देखील सांगितले आहे. काय मायक्रो प्लानिंग केले होते त्याची सविस्तर माहिती नाना पटोले यांनी देण्याची माझी तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर देसाई म्हणाले, हे सरकार काम करणारे आहे. लोकांची कामे प्रलंबित राहू नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत आहेत. झिरो पेंडन्सी हे आम्हाला आधीच सांगितले आहे. मागील नऊ दहा महिन्यात वेगाने काम सुरू आहेत.


त्यांच्या काळात ही काम झाली नाही ती आम्ही केली. त्यामुळे या लोकांना नैराश्य आलेले आहे त्यामुळे ते बोलतात.
मी काय संजय राऊत यांच्या सारखा सर्वच पक्षात डोकावत नाही. मी फक्त भाजप आणि शिवसेनेबद्दल बोलेन. संजय राऊत यांच्या सारखा विश्व प्रवक्ता मी नाही, असे सांगून महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल बोलण्यास देसाई यांनी नकार दिला.