एनसीपीएच्या सभागृहात नगरविकास दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यावेळी उपस्थित होते.
यावेकी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. शहरांचा विकास करताना कल्पकता आणि अंमलबजावणी यांचा समन्वय योग्य प्रमाणात झाला पाहिजे. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था या सेवा देणाऱ्या आहेत. शहरांमधील बदल दृष्यस्वरूपात जाणवले पाहिजे. अधिकाऱ्यांनी काम करताना आपल्या कारकीर्दीचा ठसा शहर विकासावर उमटवला जाईल, अशी कामगिरी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना अशा अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण शहराचा कायापालट होत आहे. विकास आराखड्यामध्ये सुधारणा होत आहे विकास आराखडे वेगाने तयार करण्याचे काम सुरू आहे, ज्यामध्ये घनकचरा पिण्याचे पाण्याची व्यवस्था वेगवेगळ्या पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असेही त्यांनी सांगितले.
झपाट्याने नागरिकरण झालेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असून त्यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा या जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण दिल्या जाव्यात. योजनांची अंमलबजावणी पारदर्शकपणे करा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
