राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना रंगल्या होत्या. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असून या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून मी राष्ट्रवादीसोबत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
राज्याच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. अजित पवार भाजपात जाणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा आंबेडकर म्हणाले, मी अजूनही माझ्या विधानावर ठाम आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोठा भूकंप होतो त्यावेळी त्याचे छोटे संकेत दिसायला लागतात. एक भूकंप मात्र होता होता राहिला, असे माध्यमांनी म्हटले आहे. मी सध्या भाष्य करणार नाही. माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सांगत नाही असं त्यांनी सांगितले.
