उद्धव ठाकरे व संजय राऊत हे 23 एप्रिलला जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत येत आहेत. पुतळ्याच्या अनावरणानंतर शहरातील एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापलेले दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी या सभांमधून शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकावर टीकास्र सोडलं आहे. त्यामुळे जळगावच्या सभेत उद्धव ठाकरे कोणाला लक्ष्य करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आर.ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.”
“पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार आहे,” असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.
