मुंबई : खारघर येथील श्री सेवकांच्या मृत्यू प्रकरणात असंवेदनशीलपणे आरोप करणे संजय राऊत यांना चांगलेच महागात पडणार आहे. बेताल आरोपांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसेवकांना तडफडून मारले असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 50 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी मरिन लाईन्स पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बूच बसले आहे. खारघरमध्ये 40 ते 50 मृत्यू झाले. त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही. माणसांचे जीवन पैशाने विकत घेता येत नाही. नातेवाईकांवर दबाव आणला जात आहे. त्यांची तोंडे बंद करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
खारघर येथे झालेल्या घटनेला सरकारला जबाबदार धरुन मनुष्यवधाचा गुन्हा राज्य सरकारविरोधात दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. राज्य सरकारने एकसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.
खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यू झालेले 14 पैकी 12 जण 7 तासांपासून उपाशी असल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. रणरणत्या उन्ह्यात उपाशीपोटी बसून राहिल्यानेच त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती यातून समोर आली.
