उपमुख्यमंत्र्यांची पहिली भेट मिळणार मे महिन्यात, १ कोटी १० लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

पुणे : उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नमो योजनेद्वारे दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना पहिली भेट मे महिन्यात मिळणार आहे. १ कोटी १० लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. राज्यातील १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २३ हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजे पती, पत्नी व १८ वर्षांखालील अपत्यांना रुपये २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे ३ हप्त्यात रुपये ६ हजार दरवर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. या योजनेतील लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र राहतील. उपमुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अधिकचे मिळणार आहेत. त्यांच्या खात्यात एकूण ६ अधिक ६ असे १२ हजार रुपये जमा होतील, अशी माहिती अशी माहिती योजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे

केंद्र शासनाकडून योजनेच्या एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीतील १४ वा हप्ता मे महिन्यात देण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या भूमि अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्यावत करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे व ई केवायसी प्रमाणीकरण करणे आदी बाबींची पूर्तता ३० एप्रिल २०२३ पूर्वी करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.