दंगली होणार म्हणता म्हणजे तुम्ही काही ठरविले आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा जितेंद्र आव्हाड यांना सवाल

मुंबई : आगामी काळात तुम्ही राज्यात दंगली करणार आहात असा तुमच्या वक्तव्याचा अर्थ घ्यावा का, असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केला आहे. आव्हाडांनी राज्यात जातीय दंगली होतील, असे वक्तव्य केले. त्यावर फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे अतिशय आक्षेपार्ह आहे. यामुळे प्रभू श्रीराम भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे जे विधान हे आक्षेपार्ह आहे. राम नवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल ती अत्यंत शांतपणे साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीराम आणि आणि हनुमानाच्या बाबतील प्रचंड श्रद्धा आहे. हा समस्त समाजाचा आणि राम भक्ताचा अपमान आहे. मला असे वाटते की त्यांनी संवेदनशीलपणे बोलावे.

महाराष्ट्रात आगामी काळात काही दंगली होतील म्हणजे तुम्ही काही ठरवले आहे का? मला असे वाटते की किमान नेत्यांनी तरी सनसनाटी तयार करु नये, शांतपणे बोलावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. जणू रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल घाटकोपरमध्ये एक शिबिर झाले. या शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. आव्हाड म्हणाले की, औरंगाबादला दंगल झाली. आता रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव दंगलीसाठीच झालाय की काय असे वाटते. यंदाचे वर्ष जातीय दंगलीचे आहे. कारण हे नोकऱ्या देऊ शकत नाहीत. भाव कमी करू शकत नाहीत. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाहीत. राजकीय अवमूल्यन झालेले आहे. सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे. सर्वात सोपे काय आहे, असे धार्मिक सोहळे करा. त्या सोहळ्यातून मते जमा करा. नाहीच जमले, तर आग लावून टाका.