पृथ्वीराज चव्हाण सरकारबदद्ल खदखद होती तर तेव्हाच बाहेर पडायचे ना, नाना पटोले यांचा अजित पवारांना टोला

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण सरकारबदद्ल खदखद होती तर अजित पवारांनी तेव्हाच बाहेर पडायचे ना असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, २०१०- २०१४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली? मंत्रीपदाची शपथ घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजित पवारांनी असे बोलावी ही अपेक्षा नाही. खदखद वाटत होती तर त्यावेळीच सोडून जायला हवे होते.

पुण्यातील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले होते की पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोघांसोबतही मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने काम केले. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने काम केले. वरिष्ठांच्या आदेशामुळे त्यांच्यासोबत राहिलो.

राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही, अजित पवार यांच्याकडे १४५ चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे, असे नाना पटोले म्हणाले.