आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं व्हायरल झालेलं ‘ते’ पत्र बनावट; पोलिसांत तक्रार दाखल

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पत्र दोन दिवसांपासून व्हायरल झाले होते. हे पत्र बनावट असल्याचे धर्माधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते. आता याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा तपास रायगड स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे.

शनिवारी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले. ज्यात राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला, साधकांसाठी मंडप टाकला नाही. त्यामुळे यापुढे भाजपा आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहनही करण्यात आले होते.

समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारीत होण्यास सुरवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही नोंदवली आहे. यानंतर शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादवी कलम ५००, ५०१, ५०५ (२), ५०५ (३) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६ सी आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.