महादेवराव महाडिक हे जिल्ह्याचे जादूगार, निकाल सांगण्याची गरज नाही-धनंजय महाडिक

महादेवराव महाडिक हे जिल्ह्याचे जादूगार आहेत. निकाल सांगण्याची गरज नाही. छत्रपती राजाराम कारखान्यात निवडणूक आम्हीच जिंकणार. संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. याठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.

अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सत्ताधारी महाडिक आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महादेवराव महाडिक यांनी आमचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली.

महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते,आमचा विजय निश्चित आहे. माझं कसं असत धर की पकड , स्वारी घाल की लगेच चितपट कर. माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी आहे, आमचा विजय आधीच निश्चित आहे.छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत.जित आमचीच होणार असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर शहरातील दोन केंद्रांवर मतदान होत आहे. संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदानासाठी तगडा बंदोबस्त
या निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सतेज पाटील यांच्या बावड्यात तर महादेवराव महाडिकांच्या शिरोली पुलाचीमध्ये अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. मंगळवारी 25 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या 28 वर्षांपासून राजाराम कारखान्यावर महाडिकांची सत्ता आहे. सतेज पाटील गटाकडून सत्तांतर करण्यासाठी ईर्ष्येने प्रचार करण्यात आला. महाडिकांनी सुद्धा सत्ता राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महाडिकांसाठी आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माने गटही प्रचारात दिसून आला.